छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या लढ्यात सातत्याने सक्रिय असलेले नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सततचे दौरे, सभा यामुळे त्यांच्या शरीरावर मोठा ताण आला होता. आज तीव्र ताप येत असल्याने तातडीने वैद्यकीय मदत घेण्याची गरज भासली. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत असून, सध्या प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून, कोणालाही भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. रुग्णालयाबाहेर मराठा समाजाचे समर्थक आणि बांधवांनी मोठी गर्दी केली होती. यापूर्वीही उपोषण आणि आंदोलनांदरम्यान जरांगे पाटील यांची प्रकृती अनेकदा बिघडली होती, आणि ते गॅलक्सी रुग्णालयातच उपचार घेत होते. सध्या महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत असतानाच ही बातमी समोर आली आहे.