Manoj Jarange । Kolhapur – मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगेसोयरेच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज (10 जून) त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोल्हापुरातून सकल मराठा समाजाकडून पाठिंबा देण्यात आला आहे. सकल मराठा समाजाकडून आज (10 जून) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी टाळत मुक निदर्शने केली. यावेळी बाबा इंदूलकर यांनी आरक्षणासाठी टाळाटाळ होत असल्याने जोरदार टीका केली. ते म्हणाले की, यांना आता अचानक घटनेची आठवण झाली आहे. जे पाया पडत आहेत तेच आरक्षण घालवत आहेत. ज्यांनी 16 टक्के मराठा समाजाला आरक्षण दिले, त्यांनीच आता 10 टक्के आरक्षण देत 6 टक्के का कमी केले? अशी विचारणा त्यांनी केली. तसेच आम्ही आरक्षण 16 टक्के आणि ओबीसीमधूनच घेणार असल्याचा निर्धार त्यांनी सकल मराठा समाजाकडून व्यक्त केला.