सातारा, (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाशी दीर्घकाळ लढा देणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचे शनिवारी दि. १० रोजी साताऱ्यात सदभावना रॅलीसाठी आगमन होत आहे. यानिमित्ताने साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवतीर्थ पोवई नाका येथून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने भव्य रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती समन्वयक सूत्रांनी दिली. मनोज जरांगे यांचे राजधानीत दि. १० रोजी सकाळी अकरा वाजता आगमन होणार आहे. शिवतीर्थ येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून जरांगे मराठा बांधवांच्या रॅलीत सहभागी होणार आहे. रॅली दुपारी बारा वाजता सुरु होणारी रॅली पुढे राजवाड्यावर जाऊन गांधी मैदानावर विसर्जित होणार आहे. गांधी मैदानावर मनोज जरांगे यांची तोफ धडाडणार आहे. रॅलीमध्ये त्यांचे पारंपरिक वाद्याने स्वागत केले जाणार आहे. ही रॅली हलगीच्या गजरामध्ये छत्रपती शाहू चौक, कमानी हौद, मोती चौक मार्गे राजवाडा येथे पोहोचणार आहे. गांधी मैदानावरील सभेनंतर खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मनोज जरांगे भेट घेणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील वाघनखे पाहून पुढे कोडोली येथील स्वराज्य मंगल कार्यालयात ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मराठा समन्वयकांनी दिली. गर्दीमध्ये महिलांनी आणि पुरुषांनी आपापल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या सूत्रांनी केले आहे.