Walmik Karad | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपली. यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाल्मिक कराडची आज बीड कोर्टात सुनावणी झाली. यात आता त्याची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची माहिती सीआयडीने आज न्यायालयात दिली आहे. वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. तर दुसरीकडे 9 नोव्हेंबर 2024 रोजीचे केज येथील माणिक चाटे याच्या संपर्क कार्यालयातील सीसीटीव्ही पुरावा नुकताच समोर आला आहे. अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकीचा फोन याच कार्यालयातून करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या सीसीटीव्हीत सुदर्शन घुले, माणिक चाटे, कृष्णा आंधळे, वाल्मिक कराड आणि इतर आरोपी एकत्र दिसत आहेत. तर केज पोलीस स्टेशनचे निलंबित पीएसआय राजेश पाटील हे सुद्धा यावेळी वाल्मिक कराडसोबत दिसत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हा मोठा पुरावा असल्याचे म्हंटले जात आहे. दरम्यान, यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मिक कराडचा पाठीराखा मंत्री आहे, तो सुद्धा आता यात यायला पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच एक जरी आरोपी सुटला तर राज्य बंद पडू असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. मनोज जरांगे म्हणाले की, “त्याने खूप पाप केले आहेत, आता त्याला फेडावं लागणार आहे, तो आता सुटणार नाही. आता वाल्मिक कराडच्या पाठीराख्या मंत्र्याला देखील आत (तुरूंगात टाकलं) यायला पाहिजे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. देशमुख कुटुंब तुमच्या घरी आलं आहे, त्या कुटुंबाचा अपमान होईल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊ नये असं जरांगे यांनी म्हटले आहे. बीड प्रकरणातील आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका असून आरोपी देशमुख कुटुंब मारून टाकू शकतात अशी भीती देखील जरांगे यांनी व्यक्त केली आहे. तसेच धनंजय मुंडे टोळ्या उठवून मला जातीयवादी म्हणतोय असा अशी टीका जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बीड प्रकरणावरून केलीय. बीड प्रकरणातील एक जरी आरोपी सुटला तर राज्य बंद पडू असं म्हणत तुम्ही जर एखाद्या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलाय. मनोज जरांगे पाटील सीसीटीव्हीवर बोलताना म्हणाले की, या मधल्या एकाही आरोपीला सोडू नका. खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबियांवर संकट येऊ शकत. ते दहशत सु्द्धा पसरवून शकतात. देशमुख कुटुंबियांचा सुद्धा मर्डर करतील, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.