छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला काही काही मिळाले तर काही ओबीसी नेते लगेच मागण्या करतात. पण जर ओबीसींना त्याचा फायदा झाला तर आम्हाला आनंद होतो. जर सरकार ओबीसींसाठीही अशी पावले उचलत असेल तर त्यांनी दलित, मुस्लिम, आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी उपसमित्या स्थापन कराव्यात, असे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हैदराबाद-सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी मान्य झाल्यानंतर या निर्णयाने ओबीसी आरक्षणाला धक्का बसल्याचा आरोप केला जात आहे. तर गॅझेट लागू करण्याच्या निर्णयाने मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, अशी टीकाही केली जात आहे. यावर मनोज जरांगे पाटील प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे म्हणाले, माझ्यात आणि समाजात संभ्रम निर्माण होणार नाही. मराठवाड्यातील सर्व मराठा आरक्षणात येणार आहे. हैद्राबाद अन् सातारा गॅझेटियर यात सरकारने हयगय करू नये. जर हैदराबाद आणि सातारा राजपत्रे एका महिन्यात लागू केली नाहीत, तर आम्ही सत्ताधारी पक्षांना येणाऱ्या निवडणुकीत धूळ चारायला लावू, असा इशारा त्यांनी दिला.तसेच कोकणातील मराठ्यांना अद्याप आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. कोकणातील लोकांनी आरक्षणाचा लाभ घ्यावा, अन्यथा त्यांना ४०-५० वर्षांनी पश्चात्ताप करावा लागेल. त्यांनी कोणाचेही ऐकू नये आणि त्यांच्या भावी पिढ्यांना संकटात टाकू नये, असेही ते म्हणाले.