परभणी – सरकारने आता भानावर यावे, असे म्हणत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. सरकारने आता तरी भानावर यावे. पहिल्यांदा एकदा आमचा कार्यक्रम करून बघितला. मात्र, आता नोटीसी देऊन जर काही करण्याचा प्रयत्न केला तर, तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे मुश्किल होईल, असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे यांनी परभणीच्या सेलू येथे आयोजित सभेत दिला आहे. जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही मुंबईला जाणार नाही, तशी घोषणाही दिली नाही मात्र तरीही आमच्या पोरांना नोटीसा दिल्या जात आहेत, जर तुमची इच्छाच असेल तर आम्ही नक्कीच मुंबई बघायला येऊ असंही जरांगे म्हणाले आहेत. आम्ही कायद्याच्या मार्गाने आरक्षण मागत असू अन् तुम्ही नोटिसा देत असाल तर मग आम्ही काय करणार. एखाद्याची गाडी अडवली तर, सगळ्याच गाड्या तिकडे घेऊन जायच्या. मात्र पोलिसांना सहकार्य करा त्यांचा दोष नाही वरच्यांचा आहे, असेही जरांगे यांनी म्हटले आहे. ५४ लाख नोंदी हा अधिकृत आकडा आहे. ५४ लाख नोंदी हा पुरावा. पाठीमागे आंदोलन दडपण्याचा जो प्रयोग सरकारने केला त्या भानगडीत आता पडू नये अशी माझी सरकारला विनंती आहे, असे देखील जरांगे म्हणाले. सामान्य मराठा लढाईत उतरलाय आज आणि उद्याचे २ दिवस वाट पाहणार आहे. अजूनही सरकारकडून अपेक्षा आहे. मराठ्यांचे उभे आयुष्य आंदोलनात गेले आहे. लोकशाहीने आम्हाला तो अधिकार दिला आहे. मराठ्यांची लेकरे अडचणीत आहेत. त्यांच्या पाठीमागे ताकदीने उभे राहा. तरुण आरक्षण मागतायेत पण काही नसताना त्यांना नोटिस पाठवली जाते आहे. सामान्य मराठा आरक्षणाच्या लढाईत उतरला आहे. सर्व पक्षाच्या मराठा आमदारांनी आमच्या पाठिशी उभे राहावे. तुम्हालाही आमच्या दारात तुम्हाला यायचे आहे, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला आहे.