Manoj Jarange Arrest : वातावरण पेटणार ! जरांगे पाटलांना अटक करा; ‘या’ व्यक्तीने केली मागणी

मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. आज सायंकाळी ६ वाजता आंदोलनाची परवानगी संपणार आहे. दरम्यान, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली. यात मराठा आणि कुणबी एक असल्याचे घोषित करणे आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे यासारख्या मागण्यांचा समावेश होता. या घडामोडींवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
जरांगेंना अटक करा: सदावर्ते
गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की, कायद्यासमोर कोणीही मोठा नाही. जरांगे यांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलन थांबवले नाही, तर चुकीची प्रथा निर्माण होईल आणि भविष्यातील आंदोलनांमध्येही कायद्याचे उल्लंघन होण्याचा धोका आहे. ते म्हणाले, “हे कायद्याचे राज्य आहे. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचे मत महत्त्वाचे नसून, कायदा काय सांगतो हे पाहिले पाहिजे. आझाद मैदानाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी ६ वाजल्यानंतर जरांगेंना अटक करून मजिस्ट्रेटसमोर हजर केले पाहिजे, कारण कायद्याची पायमल्ली महाराष्ट्राला परवडणारी नाही.”
न्यायमूर्ती शिंदेंवरही टीका
सदावर्ते यांनी पुढे सांगितले की, जरांगे यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर मराठा आणि कुणबी एक असल्याचे गॅझेटियरद्वारे घोषित करण्याची मागणी केली. मात्र, शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बंधनामुळे हे शक्य नसल्याचे स्पष्ट करायला हवे होते, असे सदावर्ते यांचे मत आहे. जरांगे यांनीही शिंदे यांनी याबाबत ठोस उत्तर दिले नसल्याचा दावा केला आहे.
गुन्हे मागे घेण्यास विरोध
जरांगे यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. यावर सदावर्ते यांनी आक्षेप घेत सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने अशा गुन्ह्यांबाबत कडक नियम घालून दिले आहेत. “पोलिसांवर हात उगारला गेला, त्यांच्या डोक्यातून रक्त वाहिले आहे. अशा गुन्ह्यांना माफी देऊ नये,” असे सदावर्ते यांनी ठणकावले. आता जरांगे सदावर्ते यांच्या या टीकेला काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





