चेन्नई – दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेते मनोबाला यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 69व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला असून ते अनेक दिवसांपासून आजारी होते. जानेवारी महिन्यामध्ये त्यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मनोबाला यांच्या निधनाबद्दल चित्रपटसृष्टीतील अनेक व्यक्तींनी ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे. अभिनेते मनोबाला यांनी चंद्रमुखी, गजनी, सिंघम, कांचना, भवानी, लिंगा, गुनगुन, राज्यराणी आदी चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केले. मनोबाला यांनी आपल्या करिअरमध्ये एकुण 24 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. दरम्यान, 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला मनोबाला यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. 1979 मध्ये आलेल्या पुथिया वरपुगल यांच्या चित्रपटात ते सहदिग्दर्शक म्हणून पुढे आले होते. यानंतर त्यांनी कॉमेडियन म्हणून अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या कॉमेडीचा टायमिंग अतिशय अचूक असल्याने ते विनोदी भूमिका करण्यासाठी खूपच लोकप्रिय झाले होते.