चंदिगढ : आपची सत्ता असणाऱ्या पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदल होईल. त्या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल विद्यमान मुख्यमंत्री भगवंत मान यांची जागा घेऊ शकतात, असे अंदाज वर्तवणाऱ्या चर्चा काही काळापासून सुरू आहेत. मात्र, त्या चर्चांना स्वत: केजरीवाल यांनी रविवारी पूर्णविराम दिला. पंजाबची सुत्रे मान यांच्याकडेच कायम राहणार असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी केली. केजरीवाल यांनी पंजाबमध्ये १० दिवस विपश्यना केली. त्यानंतर पंजाबमधील आप सरकारने ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याचे औचित्य साधून केजरीवाल यांनी अमृतसरस्थित सुवर्णमंदिरात प्रार्थना केली. त्यावेळी त्यांच्या समवेत मान आणि आपचे इतर नेतेही होते. नंतर केजरीवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलाचे भाकीत विरोधी पक्ष करत असल्याशी संबंधित प्रश्न पत्रकारांनी विचारला. मान ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. त्यानंतरची ५ वर्षेही तेच मुख्यमंत्री असतील, असे उत्तर केजरीवाल यांनी दिले. त्यामुळे तूर्त तरी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा थांबण्याची चिन्हे आहेत. दिल्लीत नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत आपला पराभूत व्हावे लागले. त्यामुळे त्या पक्षाच्या पंजाब शाखेत अस्वस्थता निर्माण झाल्याच्या चर्चांना तोंड फुटले. आपचे काही आमदार पक्षबदलाचे पाऊल उचलतील असा दावाही करण्यात आला. त्याशिवाय, आपने दिल्लीची सत्ता गमावल्याने पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे केजरीवाल यांचे स्वप्न भंगले. त्यामुळे ते पंजाबची सुत्रे हाती घेतील, अशा राजकीय कंड्याही पिकल्या. मात्र, केजरीवाल यांनी मांडलेल्या स्पष्ट भूमिकेमुळे संबंधित चर्चांमधील हवा निघून गेली आहे.