Mankivali Village: कडाव ग्रामपंचायतीकडून माणकिवली गावाच्या वेशीवर डंपिंग ग्राउंड उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सध्या परिसरात जोर धरत असून, या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत सदस्य तसेच स्थानिक नागरिकांना कोणतीही स्पष्ट माहिती न देता हा निर्णय घेतला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा विषय अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रस्तावित जागा ही माणकिवली गावाच्या मुख्य रस्त्यालगत असून परिसरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. याच ठिकाणी आदिवासी विकास विभागाचे शासकीय बहुउद्देशीय केंद्र, आदिवासी वस्ती, लहान मुलांची अंगणवाडी तसेच ग्रामदैवत सातीचे देव यांचे स्थान आहे. गावातील नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्यासाठी हा प्रमुख आणि एकमेव मार्ग असल्याने येथे शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांची सतत वर्दळ असते. याच परिसरासमोर स्मशानभूमी देखील असल्याने भविष्यात येथे डंपिंग ग्राउंड उभारण्यात आल्यास दुर्गंधी, अस्वच्छता आणि रोगराईचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. Pimpri-Chinchwad : साठ कोटींचा घोटाळा दाबला ! चौकशी समितीचा अहवाल समोर विशेषतः पावसाळ्यात कचऱ्यातून निर्माण होणारे दूषित पाणी तलाव आणि परिसरात पसरण्याची शक्यता असल्याने पर्यावरणीय धोका वाढू शकतो, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. स्थानिकांच्या मते, घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने स्पष्ट नियमावली निश्चित केलेली आहे. त्यानुसार डंपिंग ग्राउंड हे लोकवस्ती, शाळा, रुग्णालय, विहीर, नदी, तलाव आणि पाणवठ्यांपासून सुरक्षित अंतरावर असणे आवश्यक असते. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन यांची परवानगी, ग्रामसभेची मान्यता आणि पर्यावरणीय निकषांची पूर्तता बंधनकारक असते. मात्र या सर्व नियमांकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने निर्णय घेतला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. पोलीस बंदोबस्तामुळे संशय बळावला सर्व्हे नंबर १३७/१७ या जागेवर होणारे कथित अतिक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायतीकडून लोखंडी पत्र्याचे कंपाऊंड उभारण्यात आले. मात्र हे काम करताना प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. फक्त कंपाऊंड उभारण्यासाठी पोलिसांची आवश्यकता का भासली? असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याच कारणामुळे संबंधित ठिकाणी भविष्यात डंपिंग ग्राउंड उभारण्याची तयारी सुरू असल्याचा संशय ग्रामस्थांमध्ये अधिक बळावला आहे. याप्रकरणी प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले असले तरी पोलिसांच्या उपस्थितीमुळे ग्रामस्थांच्या शंकांना आणखी खतपाणी मिळाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. ‘सर्व्हे नंबर १३७/१७ या जागेवर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत अतिक्रमण होऊ नये यासाठी लोखंडी पत्र्याचे कंपाऊंड उभारण्यात येणार आहे. सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचे डंपिंग ग्राउंड होणार नाही.’ – प्रेमसिंग गिरसे, ग्रामसेवक, कडाव ग्रामपंचायत Pimpri-Chinchwad : साठ कोटींचा घोटाळा दाबला ! चौकशी समितीचा अहवाल समोर