Manjusha Nagpure : पुणे बंद करून दाखवाच! महापौरांचे रोहित पवारांना आव्हान
Manjusha Nagpure :

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून राजकारणाचा आरोप
Manjusha Nagpure : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून राजकीय लाभ उठविण्यासाठी पुणे बंदची हाक दिली जात असेल, तर पुणे बंद करून दाखवा, असे थेट आव्हान महापौर मंजूषा नागपुरे यांनी आमदार रोहित पवार यांना दिले.
राजकीय आंदोलनांच्या माध्यमातून पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. सभागृहनेते गणेश बिडकर या वेळी उपस्थित होते.
दरम्यान, एमपीएससीचे अध्यक्ष डॉ. विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यावरून रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढवून राजीनामा न दिल्याचा दावा त्यांनी केला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास पुणे बंद करण्याचा इशाराही पवार यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर महापौरांनी थेट आव्हान दिल्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून पुण्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
नागपुरे म्हणाल्या, की पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. शिक्षण घेतात. यातील ७० टक्के इथेच स्थायिक होतात. पुणे शहराने कायम विद्यार्थ्यांना मायेची ऊब दिली आहे. या विद्यार्थ्यांनी कधीही शहराला वेठीस धरले नाही.
विविध प्रश्नांवर आंदोलन करणे हा लोकशाहीतील अधिकार आहे. मात्र, आंदोलनाच्या नावाखाली शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत करून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही. पुणेकरांनी आतापर्यंत शांतपणे हे आंदोलन सहन केले आहे.
कोणतीही तक्रार केलेली नाही. रोहित पवार यांनी पुणे बंदची हाक दिली आहे. मात्र, कोणत्याही राजकीय आंदोलनामुळे पुणेकरांचे दैनंदिन जीवन बाधित होऊ देणार नाही.





