Manjusha Nagpure – छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला दिलेला विचार, संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचे काम अव्यहतपणे सुरू ठेवण्याची आवश्यकता असल्याचे मत पुण्याच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केले. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे आंबेगाव बुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीमध्ये गुरुवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात शिवभक्तांना, शिवप्रेमी, युवकांना नागपुरे यांनी संबोधित केले. शिवजयंतीच्या निमित्ताने आंबेगाव भागातील नवनिर्वाचित नगरसेवक हरिदास चरवड, कोमल नवले, जयश्री भूमकर, लहू लायगुडे, अरुण राजवाडे, संदीप बेलदार, प्रतिभा चोरगे, व्यंकोजी खोपडे, स्मिता कोंढरे, सीमा बेलदरे यांचा शिवसृष्टीमध्ये नागपुरे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. यावेळी शिवसृष्टीचे विश्वस्त अमृत पुरंदरे, विनित कुबेर, मनोज पोचट, मुख्य प्रशासकीय अधिकारी अनिल पवार आदी उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन शास्त्र हे उत्तम होते. आताच्या पिढीमध्ये शिक्षण घेत असणारी मुले त्याचा बारकाईने अभ्यास करीत आहेत, ही चांगली बाब आहे. त्याचा त्यांना निश्चितपणे फायदा होत असेल, असे नागपुरे यांनी नमूद केले. विनीत कुबेर यांनी आभार मानेल.