Manisha Kayande : वारीमध्ये अर्बन नक्षल शिरले; आमदार मनिषा कायंदे यांचा खळबळजनक दावा

मुंबई : आषाढी वारी ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. वर्षानुवर्ष हजारो वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे दर्शन घेण्याच्या ओढीने आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतात. यंदा आषाढी एकादाशी ही रविवारी (६ जुलै) रोजी आहे. त्यानिमित्ताने सुरु झालेली आषाढी वारी आता अंतिम टप्प्यात आहे. पण, त्याचवेळी या वारीमध्ये अर्बन नक्षल शिरल्याचा दावा शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी विधानपरिषदेमध्ये केला.
विशेष म्हणजे यावेळी सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. आता, आमदार कायंदे यांच्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. आषाढी वारीमध्ये देवाला न मानणाऱ्या नास्तिक लोकांचा शिरकाव झालेला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. हे अर्बन नक्षल संविधान दिंडी, पर्यावरण वारी, लोकायत यासारख्या वेगवेगळ्या नावाखाली हे वारीमध्ये जाऊन पथनाट्य करतात, भाषणं करतात आणि लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात. पंढरपूरच्या वारीचा ही लोकं गैरफायदा घेत आहेत, अशी माहिती मनीषा कायंदे यांनी सभागृहात दिली.
राज्य सरकार येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे. हे विधेयक अशा व्यक्तींना अटकाव करण्यासाठी आहे. हा गंभीर प्रकार आहे. यापूर्वी काही जणांनी वारीवर मटणाचे तुकडे फेकण्याचा प्रकार घडला होता. बंडातात्या कराडकर यांनीही या प्रकारावर सविस्तर भाष्य केले आहे. या सर्व प्रकारावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. दोन दिवसांमध्ये आषाढी एकादशी येत आहे. या प्रकरणावर सरकारने तातडीने गंभीर कारवाई करावी, अशी मागणीही कायंदे यांनी केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.





