Manipur Violence : मणिपूरमधील (Manipur Violence) राष्ट्रपती राजवटीला पुढील महिन्यात एक वर्षाचा कालावधी पूर्ण होईल. मात्र, अद्याप त्या राज्यात पुन्हा सरकार स्थापन होण्याविषयी अस्पष्टता आहे. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये १३ फेब्रुवारी २०२५ यादिवशी राष्ट्रपती राजवट लागू झाली. तेव्हापासून त्या राज्यातील विधानसभा संस्थगित अवस्थेत (Manipur Violence) ठेवण्यात आली आहे. विधानसभेत स्पष्ट बहुमत असणाऱ्या भाजपच्या गोटात पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे याआधी समोर आले. पक्षाच्या आमदारांच्या केंद्रीय नेत्यांसमवेत काही बैठकाही झाल्या. मात्र, पुन्हा सरकार स्थापन होण्याविषयीचा संभ्रम कायम आहे. पुढील काही दिवसांत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवटीची मुदत वाढवावी लागेल. त्यासाठी संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात वैधानिक ठराव मंजूर करणे अनिवार्य बनेल. मणिपूर विधानसभेची मुदत मार्च २०२७ मध्ये समाप्त होईल. विधानसभेचे एकूण संख्याबळ ६० आहे. भाजपचे ३७ आमदार आहेत. त्या राज्यात मे २०२३ मध्ये वांशिक संघर्षाची ठिणगी पडून हिंसाचाराचे सत्र सुरू झाले. त्यामध्ये सुमारे २६० जण मृत्युमुखी पडले. त्यामुळे टीकेचे धनी बनलेले भाजपचे नेते बिरेन सिंह यांनी अखेर फेब्रुवारी २०२५ मध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.