मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; जिरीबाममध्ये 5 ठार, चुराचंदपूरमध्ये दहशतवाद्यांचे 3 बंकर उद्ध्वस्त

MANIPUR । मणिपूरमध्ये 7 सप्टेंबरला पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. जिरीबाम जिल्ह्यातआज सकाळी झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला. ‘झोपेत असताना एका व्यक्तीवर गोळी झाडण्यात आली, तर त्यानंतर झालेल्या गोळीबारात चार सशस्त्र लोक ठार झाले.’ अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
ते पुढे म्हणाले की, ‘अतिरेक्यांनी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर एकट्या राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात घुसून त्याची गोळ्या झाडून हत्या केली. हत्येनंतर, जिल्हा मुख्यालयापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकड्यांमध्ये लढाऊ समुदायांच्या सशस्त्र लोकांमध्ये जोरदार गोळीबार झाला, ज्यामध्ये तीन पहाडी अतिरेक्यांसह चार सशस्त्र लोक ठार झाले.
MANIPUR । दहशतवाद्यांचे तीन बंकर उद्ध्वस्त करण्यात आले
बिष्णुपूरमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या रॉकेट हल्ल्यात एक जण ठार आणि सहा जण जखमी झाल्यानंतर सुरक्षा दलांनी चुराचंदपूर जिल्ह्यात तीन बंकर उद्ध्वस्त केले. चुराचंदपूर जिल्ह्यातील मुलसांग आणि लायका मुअलसौ गावात पोलिसांनी शुक्रवारी ही मोहीम सुरू केली होती.
वृत्तमाध्यमांशी बोलतांना पोलिसांनी पुढे सांगितले की, ‘दहशतवाद्यांनी बिष्णुपूर जिल्ह्यात दोन ठिकाणी लांब पल्ल्याची रॉकेट डागली. या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला तर अन्य सहा नागरिक जखमी झाले आहेत. यानंतर पोलिस दल आणि सुरक्षा दलांनी जवळपासच्या डोंगराळ भागात ऑपरेशन सुरू केले. यावेळी बिष्णुपूरच्या पोलिस अधीक्षकांसह पोलिस अधिकारी परिसरात पोहोचताच संशयित दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर पोलिसांच्या पथकाने प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांचा हल्ला हाणून पाडला.’
MANIPUR । ड्रोनच्या भीतीने लोकांनी लाईट बंद केले
यापूर्वी, मणिपूरच्या बिष्णुपूर आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील भागातील लोकांनी अनेक ड्रोन दिसल्यानंतर त्यांच्या घरांचे दिवे बंद केले. नुकतेच इंफाळ पश्चिम जिल्ह्यात दोन ठिकाणी लोकांवर बॉम्ब टाकण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता. नारायणसेना, बिष्णुपूर जिल्ह्यातील नंबोल कामोंग आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील पुखाओ, डोलैथाबी, शांतीपूर येथे अनेक ड्रोन दिसले. या नंतर . घाबरलेल्या गावकऱ्यांनी घरातील दिवे बंद केले.





