Manipur News : मणिपूरमध्ये कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याने 5 पोलिसांचे निलंबन

इम्फाळ : मणिपूर पोलिसांनी गंभीर गैरवर्तन आणि कर्तव्यात निष्काळजीपणाच्या आरोपाखाली एका निरीक्षकासह पाच पोलिसांना निलंबित केले आहे. पोलिस महासंचालक राजीव सिंह यांनी या संदर्भात एक आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, सीडीओ इंफाळ पूर्वचे प्रभारी निरीक्षक निंगथौजम देवदास सिंह यांना गंभीर गैरवर्तनाच्या आरोपाखाली तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
निलंबित करण्यात आलेल्या इतर चार पोलिसांमध्ये इम्फाळ पूर्व कमांडो युनिटचे सब इन्स्पेक्टर बी देबसन सिंग, कॉन्स्टेबल तारिक अझीझ, थौबल कमांडो युनिटचे हेड कॉन्स्टेबल मोहम्मद रकीब आणि खाबेसोई (इम्फाळ पूर्व) येथील मणिपूर रायफल्सच्या ७ व्या बटालियनचे जमादार मोहम्मद अमीन शाह यांचा समावेश आहे.निलंबनाच्या कालावधीत, देवदास सिंह यांचे मुख्यालय इंफाळ पूर्व जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक कार्यालय असेल.
देवदास सिंह यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कुठेही जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यांना सेवा नियमांनुसार निर्वाह भत्ता मिळेल. पोलिसांनी खुद्द पोलिसांवरील आरोपांबद्दल अधिकृतपणे माहिती दिलेली नाही, परंतु या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे निलंबन ड्रग्ज तस्करीशी संबंधित आहे. सब इन्स्पेक्टर देबसन सिंग यांना यापूर्वी २०१३ मध्ये तेंग्नौपाल जिल्ह्यातील मोरेह येथे ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ड्रग्जची तस्करी केल्याबद्दल अटक करण्यात आली होती.




