Manipur News : लुटलेली, अवैध शस्त्रास्त्रे 7 दिवसांत जमा करा; मणिपूरच्या राज्यपालांचे जनतेला आवाहन

इंफाळ : मणिपूरचे राज्यपाल अजयकुमार भल्ला यांनी लुटलेली, अवैध शस्त्रास्त्रे जमा करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. स्वेच्छेने शस्त्रास्त्रे जमा करण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मणिपूरमध्ये २१ महिन्यांपूर्वी वांशिक संघर्षातून हिंसाचार उसळला. त्या राज्यात हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या.
त्यामध्ये सुमारे २५० जण मृत्युमुखी पडले. तर, मोठ्या संख्येने लोक बेघर झाले. त्यातून त्या राज्याने प्रदीर्घ काळ अशांत स्थिती अनुभवली. हिंसाचाराच्या काळात सुरक्षा दलांकडील शस्त्रास्त्रे जमावांनी लुटल्याचेही प्रकार घडले. काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. आता त्या राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशातून राज्यपाल ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.
त्यांनी नजीकचे पोलीस ठाणे, चौक्या आणि सुरक्षा दलांच्या छावण्यांमध्ये शस्त्रास्त्रे, दारूगोळा जमा करण्याची सूचना सर्व समुदायांना केली आहे. संबंधित पाऊल शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. राज्यपालांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळणार ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.




