इंफाळ : मणिपूरमध्ये पुन्हा सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठीची जुळवाजुळव भाजपने सुरू केल्याचे स्पष्ट संकेत शनिवारी मिळाले. भाजपच्या प्रदेशाध्यक्षा ए.शारदा देवी यांनी पक्षाच्या प्रदेश मुख्यालयात एक बैठक घेतली. त्यामध्ये भाजपचे 13 आमदार सहभागी झाले. बैठकीनंतर शारदा देवी यांनी महत्वाचे सूतोवाच केले. मणिपूरला लोकनियुक्त सरकार देण्याची भाजपची इच्छा आहे. पक्षाच्या आमदारांची एकजूट आधीपेक्षाही अधिक मजबूत आहे. सरकारची स्थापना ही सर्वच आमदारांची जबाबदारी आहे. पक्षालाही सरकार स्थापन झालेले हवेय. ते उद्दिष्ट गाठण्याच्या प्रक्रियेत आम्ही गुंतलो आहोत, असे त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. सरकार स्थापनेसाठी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची परवानगी घ्या अशी विनंती आम्ही प्रदेशाध्यक्षांना केली, असे काही आमदारांनी नमूद केले. सरकार स्थापना केंद्रावर अवलंबून असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. मणिपूरमध्ये 2 वर्षांपूर्वी वांशिक संघर्षाची ठिणगी पडली. त्यानंतर हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. त्यावरून सत्तारूढ भाजप आणि राज्य सरकारचे नेतृत्व करणारे एन.बिरेन सिंह टीकेचे धनी बनले. सिंह यांनी चालू वर्षी फेब्रुवारीत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.