मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर हल्ला, 2 जवान शहीद, 3 जखमी

इंफाळ : मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले, तर किमान तीन जवान जखमी झाले. ही घटना नांबोल सबल लेइकाई परिसरात सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली, जेव्हा जवानांचे वाहन इंफाळहून बिष्णुपूरच्या दिशेने जात होते. पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, बंदूकधारी दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला केला. यात एक कनिष्ठ अधिकारी (जेसीओ) आणि एक जवान शहीद झाले, तर दोन जवान जखमी झाले. हल्लेखोरांनी व्यस्त रस्त्यावर वाहनावर गोळीबार केल्यानंतर पांढऱ्या व्हॅनमधून पळ काढला. नागरिकांना कोणतीही हानी होऊ नये यासाठी जवानांनी संयम राखत प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.
मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. राजभवनातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या सुरक्षेसाठी आसाम रायफल्सचे दोन शूर जवान शहीद झाले. राज्यपालांनी शहीदांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केली आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. त्यांनी असे घृणास्पद हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत, असे ठामपणे सांगितले.
Two Assam Rifles personnel, including one JCO and one jawan, were killed in an attack by terrorists in the Bishnupur district of Manipur. Two jawans are injured. The terrorists escaped in a white van after attacking the vehicle in which the troops were travelling on a busy road.… https://t.co/UOgaDOEGGo
— ANI (@ANI) September 19, 2025
मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले, “33 आसाम रायफल्सच्या शूर जवानांवरील हल्ला अत्यंत दुखद आहे. दोन जवान शहीद आणि इतरांच्या जखमी होण्याची बातमी मनाला चटका लावणारी आहे. शहीदांचे शौर्य आणि बलिदान कायम स्मरणात राहील. या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा मिळायला हवी.
”या हल्ल्यामागे मोठा कट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, आसाम रायफल्सच्या ताफ्याच्या मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का, याचाही तपास सुरू आहे.




