पुणे जिल्हा | सातगाव पठार परिसरातील आंब्यांना कमी मोहोर

पेठ, (वार्ताहर) – सातगाव पठार तालुका आंबेगाव भागात अनेक दिवसांपासून वातावरणातील विपरित बदलांमुळे परिसरातील बहुसंख्य आंब्याच्या झाडांना अद्यापि मोहोर आलेलाच नाही. ज्या झाडांनी मोहोर आलेला आहे, तो अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे आंबा उत्पादन घटणार, या भीतीने सातगाव पठार भागातील शेतकरी चिंतातूर बनलेला आहे.
सातगाव पठार भागातील कारेगाव, भावडी, थुगाव, कुरवंडी, पेठ व पारगाव या ठिकाणच्या अनेक शेतकऱ्यांनी फळबागाअंतर्गत आंब्याच्या विविध जातीची झाडे आपल्या शेतात लावली आहे. तर काही शेतकऱ्यांनी बांधावर कलमी आंब्याची झाडे लावलेली आहे.
सातगाव पठार भागामध्ये सुरुवातीपासूनच पाहिजे तेवढा पाऊस झालेला नाही. मध्यंतरी सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांना प्रचंड अशा गारपिटीला सामोरे जावे लागले. अद्यापही ग्रामीण भागातील आंब्याला मोहोर फुटलेला नाही. साधारण डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मोहोर फुटण्यास सुरुवात होते. पण निम्मा फेब्रुवारी गेला तरी अनेक शेतकऱ्यांच्या झाडांना मोहोर न फुटल्याने शेतकरी चिंतेत आहे. सद्यस्थितीत आंबा हे सर्वत्र महत्त्वाचे रोखीचे फळ पीक आहे. उशिरा आलेल्या थंडीमुळे आंब्याची अनेक झाडे मोहोरली नाही.
हवामानात विपरित बदल होत असल्यामुळे वातावरणात प्रचंड बदल होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा वातावरणामध्ये बदल होणार असल्याचा हवामानाचा अंदाज आहे. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात उष्णपणा जाणवत आहे. काही झाडांनी मोहोर धरलेला आहे. तर, काहींना अजूनही मोहोर नाही. निम्मा फेब्रुवारी संपत आला, तरी सातगाव पठार भागातील अनेक आंब्याच्या झाडांना अजून मोहोर फुटलेला नाही.- संजय कराळे, प्रगतिशील शेतकरी, कारेगाव
या बदलत्या हवामानामुळे आंबा पीक धोक्यात आले आहे. पुढे भविष्यात या फळबागेत गुंतवलेले पैसे तरी वसूल होतात का, हे सारे आता निसर्गावरच अवलंबून आहे. – सोपान नवले, प्रगतिशील शेतकरी, भावडी





