Mango Festival – दिल्लीकरांना अस्सल देवगड, रत्नागिरी हापूस आंब्याची तसेच अन्य कोकणी उत्पादनांची चव चाखायला मिळावी, यासाठी देशाच्या राजधानीत आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत खासदार रविंद्र वायकर यांनी आज दिली. दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे आयोजित आंबा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ३० एप्रिलला सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांच्या अभिनव संकल्पनेच्या मध्यमातून दिल्ली येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील देवगड व रत्नागिरीतील हापूस आंबा महाराष्ट्रात व देशभरात खूपच प्रसिद्ध आहे. कोकणातील शेतकऱ्यांना विविध राज्यांमध्ये थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा, आंब्याच्या निर्यातीला अधिक चालना मिळावी, या उदात्त हेतूने खासदार वायकर यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये ३० एप्रिल ते १ मे (महाराष्ट्र दिन) पर्यंत आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवाला केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरच देशाच्या विविध राज्यातील खासदार व आमदारही उपस्थित राहणार आहेत.