प्रभात वृत्तसेवा खालापूर – काळोखे यांना जनतेने निवडून दिले आहे, याबद्दल द्वेषाची भावना मनात धरून नियोजित कट करुन एखाद्याला संपविणे निंदनीय आहे. समाविघातक वृत्ती ठेचून काढण्यासाठी सदर खटला फास्ट ट्रॅकवर नेऊ. सरकारी वकील देऊन आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंगेश काळोखे यांची शुक्रवारी दि.२६ डिसेंबर रोजी सकाळी भर रस्त्यावर निर्घृण हत्या झाल्याने खोपोली शहरासह रायगड जिल्हा हादरला आहे. आरोपींना लवकरच पकडण्यासाठी दिवसभर महिला आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले, महामार्ग रोखून धरला होता. रात्री मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी विनंती केल्यावर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला. रात्री उशीरा मंगेश काळोखे यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. 27 डिसेंबर रोजी सकाळी आमदार महेंद्र थोरवे यांनी मंगेश काळोखे यांच्या कुटूंबाची भेट घेतली त्यानंतर सायंकाळी ४ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मंगेश काळोखे यांच्या निवासस्थानी भेट कुटूंबाचे सात्वंन केले.मंगेश काळोखे हे शिवसेनेचे पदाधिकारी असून आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. विधानसभा निवडणुकीत आमदार थोरवे यांना आपल्या परिसरातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. शिवसेनेने त्यांच्या पत्नी नगरसेविका मानसी काळोखे यांना नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत प्रभाग 2 मधून मानसी मंगेश काळोखे निवडून आल्या आहेत. यावेळी प्रभागात किरकोळ वाद झाल्याची घटना घडली. या वादावर त्यावेळेस पडदा ही पडला होता. मात्र त्यानंतर दि. 26 डिसेंबर सकाळी मंगेश काळोखे आपल्या मुलींना जनता विद्यालयात शिशु मंदिरला सोडून पुन्हा आपल्या घरी परतत असताना मारेकऱ्यांनी विहारी गावाजवळ त्यांना गाठून धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली. पत्नी नगरसेविका झाल्यानंतर अवघ्या पाचच दिवसांत मंगेश काळोखे यांचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठा आक्रोश आणि संताप आहे.