अमृतसर : उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि साहिबाबाद पोलिसांच्या संयुक्त पथकाने अमृतसरमध्ये छापा टाकला आणि एका खलिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी गेल्या 30 वर्षांपासून फरार होता. माहिती मिळाल्यानंतर, यूपी एटीएस टीमने अमृतसर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर तिम्मेवाला गावात छापा टाकण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आली. या दहशतवाद्याची ओळख मंगत सिंग अशी झाली आहे, जो अमृतसर ग्रामीणमध्ये लपला होता. खलिस्तानी संघटनेचा सदस्य मंगत सिंग याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी मंगत सिंग याच्यावर १९९३ पासून खुनाचा प्रयत्न, शस्त्रास्त्र कायदा आणि दहशतवादी कारवाया (प्रतिबंध) कायदा (टाडा) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मंगत सिंगला पहिल्यांदा १९९३ मध्ये अटक करण्यात आली होती. दोन वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर १९९५ मध्ये त्याला जामीन मिळाला. पण बाहेर आल्यानंतर मंगत सिंग फरार झाला. तो जवळजवळ ३० वर्षे फरार होता.