Pimpri : पारंपारिक खेळांनी मंगळागौर साजरी

पिंपळे गुरव : सुयोग कॉलनी महिला मंडळ आणि ओम साई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळागौरी पूजन मोठ्या उत्साहात पार पडले. अन्नपूर्णा देवीची प्रतिमा चौरंगावर स्थापित करून गणपतीपूजन, कलश, घंटा व दीप पूजनानंतर शिवमंगळागौरीचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक खेळांनी करण्यात आली. साधी फुगडी, चौफुली फुगडी, जाते फुगडी, सूपली फुगडी यांसारख्या अनेक मजेदार फुगडींच्या प्रकारांमध्ये महिलांनी सहभाग घेतला. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध जुनी मंगळागौरी गाणी लावून महिलांनी पारंपारिक पद्धतीत नृत्य सादर केले. स्मार्ट सिटीच्या आधुनिक वातावरणातही महाराष्ट्राची परंपरा जपण्याचा हा उपक्रम महिलांनी साजरा केला.
सुयोग कॉलनी महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रीती मराठे म्हणाल्या, “एक स्त्री लक्ष्मी असते, परंतु परिस्थिती आल्यास ती दुर्गा होऊ शकते. आजच्या काळात स्त्रीने लक्ष्मीबरोबरच दुर्गा होण्याची गरज आहे.”
या कार्यक्रमात नयन शिंदे, अवनी शिंदे, उज्वला पाटील, शालिनी यादव, शिल्पा राऊत, सिमा मराडे, ज्योती आव्हाड, सीमा कांबळे, राणी टोपले, प्रिया भोसले, प्रियंका पांडे तसेच लहान मुलींमध्ये सिया मराठे, दुर्वा शिंदे, मन्नत सारसर, सई मराठे, दुर्वा कुलकर्णी, अनया इंगवले, जिजा भोसले, काव्या शिंदे, अन्वी कदम, ओवी राऊत यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे यांचे विशेष सहकार्य लाभले.





