चला हो पंढरी जाऊ । जीवाच्या जिवलगा पाहू ।। भीवरे स्नान करुनिया । संत-पद-धूळ शिरी ।।देहूगाव – अशी अवस्था असलेले भाविक दोन वर्षांनंतर देहूत दाखल झाले. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याकरिता राज्याबरोबरच परराज्यातूनही दाखल झालेले वारकरी देहूत भक्तिरसात न्हाऊन निघाले. पंढरीच्या लोका नाही अभिमान । पाया पडे जन एकमेका ।। या संतोक्तीप्रमाणे पालखी सोहळ्यात आलेले वारकरी एकमेकांचे चरणस्पर्श करत होते. आदराने एकमेकांना “माऊली-माऊली’ म्हणत गळा भेट घेत, या वैष्णवजनांनी परमसुखाचा आनंद लुटला. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त तीर्थक्षेत्र देहू येथे सप्ताह, हरिनाम, भजन व कीर्तनामुळे देहूतील वातावरण भक्तिमय झाले होते. सोमवारी, पालखी प्रस्थानदिनी पहाटेपासूनच भाविकांचा ओघ मंदिराकडे सुरू होता. सकाळपासूनचे आकाशात मेघांनी गर्दी केली होती. अधून मधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी वारकऱ्यांचा उत्साह वाढवित होत्या. तर दर्शनासाठी इंद्रायणीतीरी लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. देहू ग्रामस्थांसह विविध सामाजिक संस्था आणि तसेच सेवाभावी प्रति वर्ष महाप्रसादाचे वाटप करणारे अन्नदान मंडळ भाविक वारकऱ्यांची सेवा पुरवण्यात मग्न होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळाकडून गेली 28 वर्षे वारकऱ्यांना महाप्रसाद वाटपाची सेवा बजावत आहे. ब्रिगेडियर जी. एस. रावत, लेफ्टनंट कर्नल भूपेंद्र सागी यांनी याठिकाणी अन्नदानात सहभाग घेतला. यांनीही घेतला फुगडीचा आनंद या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आवर्जुन उपस्थित होत्या. त्यांनी पादुका पूजन सोहळ्यात सहभाग घेतला. तर पवार कुटुंबातील जामखेडचे आमदार रोहित पवार व मावळचे आमदार सुनील शेळके हेदेखील उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी महिला वारकऱ्यांबरोबर फुगडी घातली. तर आमदार पवार व शेळके यांची फुगडीदेखील चांगलीच रंगली. यामुळे अजित पवार सोहळ्याला अनुपस्थित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजित दौऱ्याप्रमाणे आज दुपारी देहू येथे हेलिकॉप्टरने येणार होते. तसा शासकीय दौरादेखील जाहीर करण्यात आला होता. मात्र, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरने प्रवास करणे शक्य नसल्याने त्यांचा देहू येथील दौरा रद्द झाला, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पुतण्या आमदार रोहित पवार हे पवार कुटुंबातील दोघे जण या सोहळ्याला उपस्थित होते. यंदाचा 337 वा पालखी सोहळा पंढरीची ओढ असलेले हजारो वारकरी, भाविक पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तीर्थक्षेत्र देहूत आगमन झाले होते. पालखी सोहळ्याची परंपरा जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे सुपुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी 1685 मध्ये सुरू केली. वारीचे हे 337 वे वर्ष आहे. गत दोन वर्षे करोनामुळे पायी वारीच्या खंडानंतर पालखी सोहळा पुन्हा होत असल्याने भाविक वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यंदाच्या सोहळ्यासाठी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.