पुणे- खेड तालुक्याच्या पश्चिम भागात आज चक्रीवादळ जोराचा पाऊस झाला. या पावसात मंदोशी गावाच्या जावळेवाडीमधील १५ पेक्षा जास्त घरांचे छप्पर, पत्रे, कौले उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. जावळेवाडीला वीज पुरवठा करणारे विजेचे सहा खांब जमीनदोस्त झाल्याने आदिवासी भागातील या वाडीतील २५ कुटुंबे अंधारात आहेत.
खेड तालुक्यातील भीमाशंकरला जाणाऱ्या मंदोशी घाटाच्या कुशीत चारही बाजूने डोंगर असलेली २५ पेक्षा जास्त कुटुंबाची आदिवासी वस्ती आहे. मंदोशीच्या जावळेवाडीवरील संकटे वर्षानुवर्षे संपत नाहीत. कधी अवकाळी पाऊस, कधी अतिवृष्टी, कधी भुसक्कलनाचा धोका तर कधी विजेचा लपंडाव, नादुरुस्त रस्ता अशा गंभीर समस्यांच्या विळख्यात जावळेवाडीतील २५ ते ३० कुटुंबे सापडली आहेत.या वाडीमधील सुमारे १५० नागरिकांना वर्षानु वर्षे या संकटांचा सामना करावा लागत आहे.
खेड तालुक्यातील पश्चिम भागात आजदुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार चक्रीवादळ झाले. या वादळांतर जोरदार सरी कोसळल्या. या भागातील मंदोशी, शिरगाव, टोकावडे, मोरोशी, कारकुडी, धुवोली, वांजळे, पाभे आदी परिसरात वादळी पाऊस झाल्याने घरांसह शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले.अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
करोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन व रोजगार नसल्याने या कुटुंबाकडे घर दुरुस्तीसाठी पैसे नाहीत. महसूल विभागाने नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करून आदिवासी कुटुंबाला घर दुरुस्त करण्यासाठी तात्काळ मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंब प्रमुखांची केली आहे.