वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! भक्तनिवासमध्ये भाविकांना अल्पदरात मिळणार नाश्ता अन् जेवण ; मंदिर समितीने हॉटेल घेतले ताब्यात

Mandir Samiti । महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्याचे भक्त पंढरपूरला पायी वारी करण्यासाठी निघाले आहेत. याच विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आलीय. आता यापुढे मंदिर समितीच्या भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे. मंदिर समितीने त्याठिकाणचे हॉटेल ताब्यात घेतले आहे. जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर मंदिर समितीने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
जास्त दर लावून भाविकांची लुटीच्या तक्रारी Mandir Samiti ।
विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना सर्वात चांगली सुविधा देण्यासाठी मंदिर समितीने उभारलेले विविध भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी भाविकांचा ओढा असतो. अतिशय भव्य स्वरुपात उभारलेल्या या विविध भक्तनिवासांमध्ये असलेल्या 364 रुममध्ये जवळपास रोज 1500 भाविक निवास करु शकतात.
अतिशय आलिशान पद्धतीने उभारलेले नवीन भक्त निवास तर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र असते. या भक्त निवासामध्ये देशभरातून येणाऱ्या भाविकांना चांगल्या प्रतीचे चहा, नाश्ता, भोजन मिळावे यासाठी या हॉटेलचा ठेका देण्यात आला होता. मात्र, जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे.
भाविकांच्या खिशाला लागणारी कात्री होणार बंद Mandir Samiti ।
दरम्यान, मंदिर समितीच्या निर्णयानंतर कालपासून याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. भाविक येथील अल्पदरात मिळणाऱ्या आणि चांगल्या प्रतीच्या खाद्यपदार्थावर खुश असून मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड सर्व सुविधांकडे लक्ष ठेवून आहेत. यासाठी मंदिर समितीचे येथे येणाऱ्या देशभरातील भाविकांना चहा , कॉफी , दूध आणि नाश्त्याच्या दरात निम्म्याने कपात केली असून जेवणाची थाळी तर केवळ 100 रुपयात ठेवल्याने भाविकांना हे परवडणारे आहे. या भक्तनिवासमध्ये वर्षभरात देशभरातून तीन लाखापेक्षा जास्त भाविक निवासासाठी येत असतात. आता मंदिर समिती या भाविकांना चांगल्या प्रतीचे खाद्यपदार्थ अतिशय अल्पदरात देणार आहे.





