पुणे | अजितदादांकडून मानकरांची मनधरणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पक्षाकडे विधान परिषदेच्या जागेची मागणी केली होती. मात्र, पक्षाकडून संधी न देण्यात आल्याने मानकर यांच्यासह पुणे शहरातील राष्ट्रवादीच्या सुमारे ८५० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे देत नाराजी व्यक्त केली होती.
त्याची दखल अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली असून, शहराध्यक्ष दीपक मानकर यांची मनधरणी केली आहे, तसेच त्यांना योग्य संधी देण्याचेही आश्वासन दिले आहे.
पवार यांनी शुक्रवारी मुंबईत मानकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मानकर यांच्यासह पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे मागे घेतले असल्याचे मानकर यांनी कळविले आहे.
मानकर म्हणाले, की पुणे शहर कार्यकारिणीच्या कार्यावर अजित पवार अत्यंत समाधानी आहेत. त्यांचे पुण्यातील कार्यकर्त्यांवर विशेष प्रेम असून, कोणत्याही पदाधिकाऱ्याचा राजीनामा स्वीकारला जाणार नसल्याचे ते म्हणाले.
शहरातील सर्वच कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आपण तयार केलेले संघटन कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले; परंतु काही कारणास्तव ती मागणी पूर्ण करता आली नाही. येत्या काळात आपल्याला योग्य वेळी योग्य न्याय दिला जाईल, अशी ग्वाही दादांनी या वेळी दिली आहे.
शहरातील सर्वच कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या कामाची प्रशंसा करत दादांनी या कार्याची योग्य पोचपावती लवकरच दिली जाईल, असा ठाम विश्वास मला दिला असल्याचे मानकर यांनी सांगितले





