Parner Bhushan Award: कृषी व जनविकास प्रतिष्ठान, पारनेर यांच्या वतीने दिला जाणारा ‘पारनेर भूषण पुरस्कार २०२६’ जांबुत येथील जय मल्हार हायस्कूलच्या पर्यवेक्षिका तसेच क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख मंदाकिनी पांडुरंग आंधळे यांना जाहीर झाला आहे. शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन तसेच विद्यार्थी गुणवत्तावाढीसाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पारनेर येथे दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव (आळंदी) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, खादी ग्रामोद्योग माजी सचिव भाई कमलानंद (आयएएस) तसेच पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष डॉ. विद्या कावरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, या निवडीबद्दल मुख्याध्यापक सुनील जाधव, शिवाजीराव धायगुडे, आर. एस. कापसे, पांडुरंग आंधळे, सतीश फिरोदिया, सुनीता कड, वासुदेव जोरी, दत्तात्रय जोरी, आनंदराव जगताप व बाळासाहेब पठारे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.