प्रभात वृत्तसेवा मंचर – ज्येष्ठ नागरिकांनी आनंदी जीवन जगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सकारात्मक विचार घेऊन कुटुंबासह गावाचा विकास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची भूमिका महत्त्वाची असते,असे मत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती व डी. जी. फाउंडेशनच्या वतीने आधारवड या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा मंचर येथे संपन्न झाला. माजी खासदार व पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे बाळासाहेब बेंडे,निलेश थोरात, नवनाथ हुले,संजय थोरात, राजश्री गांजाळे, सचिन भोर,अण्णासाहेब टेकाळे, चंद्रकांत महामुनी, हनुमंत कुंभार, एकनाथ वाळुंज, प्रकाश खोचेकर, देवराम नाबगे, यांच्या सह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. जी खासदार आढळराव पाटील,अण्णासाहेब टेकाळे यांनी भाषणामध्ये ज्येष्ठांच्या जीवनशैलीबद्दल विचार व्यक्त करून आनंददायी जीवन जगण्याचा सल्ला दिला.माजी गृहमंत्री वळसे पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरगुळा भवन देण्याचे आश्वासन दिले.फेस्कॉमचे उपाध्यक्ष ए.एफ.इनामदार यांनी समितीने तयार केलेल्या स्मरणिकेबद्दल व समन्वय समितीच्या कार्याबद्दल माहिती दिली. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे विरगुळाभवनांची मागणी अध्यक्ष दशरथ भालेराव यांनी केली.सभेमध्ये संजय थोरात, हनुमंत कुंभार यांची भाषणे झाली.ज्यांनी स्मरणिकेसाठी देणगी दिली. त्यांचा सत्कार करण्यात आला.आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष दशरथ भालेराव,उपाध्यक्ष ए.एफ. इनामदार, काशिनाथ वळसे पाटील, सोपानराव नवले,सखाराम भालेराव, सूर्यकांत थोरात,भास्कर लोंढे,मारुती भोर,दत्तात्रय राऊत इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. सखाराम भालेराव यांनी प्रास्ताविक व संजय बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. सोपान हुले यांनी आभार मानले.