प्रभात वृत्तसेवा मंचर – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर प्रकल्पासाठी चांडोली खुर्द (ता.आंबेगाव) येथील गायरान गट क्रमांक ४८१/१/अ मधील १२ हे.०८ आर क्षेत्र देण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामपंचायत चांडोली खुर्द व ग्रामस्थांनी केली आहे. गायरान जमिनीवर सौर प्रकल्पास ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून या संदर्भात संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन भाजप उद्योग आघाडीचे जिल्हा संयोजक प्रमोद बाणखेले, चांडोलीचे उपसरपंच अमोल दाभाडे आणि ग्रामस्थांनी दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की जिल्हाधिकारी कार्यालय पुणे महसूल शाखेच्या दि. २८ ऑगस्ट २०२३ च्या आदेशानुसार सदर गायरान क्षेत्र सौर प्रकल्पासाठी देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले. गायरान गट क्रमांक २३३ मधील ६ हे. क्षेत्र यापूर्वीच मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती यांना देण्यात आले आहे. या गायरान क्षेत्र घोडनदी किनारी व पाणथळ स्वरूपाचे असल्याने तसेच बैलगाडा घाट व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वापरात असल्याने या ठिकाणी सौर प्रकल्प उभारल्यास ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे. ग्रामसभेने केवळ २ हे क्षेत्र देण्याचा ठराव घेतलेला असताना प्रत्यक्षात १२.०८ हे. क्षेत्राचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तरी हा आदेश दुरुस्त करून रस्त्यालगतचा भाग वगळून गावाच्या विकासास अडथळा न होणाऱ्या एका बाजूला मर्यादित क्षेत्रातच सौर प्रकल्प राबवावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. चांडोली येथील गायरान जमिनीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर प्रकल्प उभारणार असून काही जागा सोडून दोन-तीन ठिकाणी वेगळ्या बाजूने प्रकल्प उभारणार आहे. तरी तेथे एका बाजूला तो प्रकल्प उभारून उर्वरित जागा ग्रामस्थांना विकास कामांसाठी वापरता येईल. यासाठी सूचना केली जाईल,असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिल्याची माहिती प्रमोद बाणखेले यांनी दिली.