प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर (ता.आंबेगाव) येथील नव्याने स्थापन झालेल्या मंचर नगरपंचायतीच्या एकूण १७ प्रभागांपैकी किमान तीन प्रभागांमध्ये नागरी समस्या कायम आहेत. त्या आगामी निवडणुकीत ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. पथदिवे नसल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य, ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव, आणि रस्त्यांची दुरवस्था या प्रमुख समस्या नागरिकांना भेडसावत आहेत.अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून रस्त्यांवर चिखलाचे दलदलीचे स्वरूप निर्माण होते. नागरी समस्या प्रलंबित असून नागरिकांनी वारंवार मागण्या करूनही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्याने आता या प्रश्नांवर उमेदवार काय भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मतदारांचा भर आता आश्वासनांवर नसून प्रत्यक्ष काम करणाऱ्या उमेदवारांवर राहणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले.रस्ते, पथदिवे आणि ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधा नसल्याने शहराच्या विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत केवळ राजकारण नव्हे, तर नागरी सुविधा आणि विकास हाच मुख्य मुद्दा ठरणार आहे.