प्रभात वृत्तसेवा मंचर – आळंदी येथील एकादशी यात्रा शनिवार, दि.१५ रोजी असल्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर वारकऱ्यांच्या दिंडींचा ओघ वाढला आहे. नाशिक, संगमनेर, कल्याण, मुरबाड, अकोले, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील हजारो वारकरी भगव्या पताका, टाळ, मृदंग आणि नामस्मरणाच्या गजरात आळंदीकडे प्रस्थान करत आहेत.सकाळपासूनच महामार्ग दिंडींच्या ताफ्याने अक्षरशः फुलून गेला असून सर्वत्र “राम कृष्ण हरी”चा अखंड नाद घुमत आहे. वारकऱ्यांच्या या चालण्यात श्रद्धा, भक्ती आणि आनंद यांचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे.मार्गात ठिकठिकाणी ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि उद्योजक यांच्या वतीने चहापाणी, नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या या दिंडींमुळे पुणे-नाशिक रस्त्यावर वाहतूक काही ठिकाणी संथ गतीने सुरू असली तरी नागरिकांमध्ये मात्र धार्मिक भावनेचे वातावरण आहे.आळंदीच्या दिशेने चालणाऱ्या या दिंडींनी संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले असून एकादशी यात्रेच्या स्वागतासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. “दिंड्यांमुळे भाविकांची सेवा करण्याची संधी अनेकांना मिळते.त्याच्यातच सर्व पुण्य मिळते.” – मोहन थोरात, उद्योजक पुणे.