Manchar News – मंचर नगरपंचायतीच्या हद्दीतील मालमत्ता कर (घरपट्टी), पाणीपट्टी तसेच इतर करांची थकबाकी मोठ्या प्रमाणात बाकी असल्याचे समोर आले आहे.या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने थकबाकीदार नागरिकांना तातडीने कर भरण्याचे आवाहन केले आहे. नगरपंचायतीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, अनेक नागरिकांनी अद्याप कर भरणा केलेला नसून त्यामुळे नगरपंचायतीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. शहरातील मूलभूत सुविधा आणि विकासकामे सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कर वसुली अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.सदर मुदतीत कराचा भरणा न करणाऱ्या संबंधित थकबाकीदारांवर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १५२ व १५६ नुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये मालमत्ता जप्ती तसेच लिलावाची प्रक्रिया राबविण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.तरी सर्व नागरिकांनी कोणतीही कारवाई टाळण्यासाठी दिलेल्या मुदतीत तात्काळ थकबाकी भरून नगरपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे.