प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर शहर व परिसरात दिवसा-रात्री बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या वाढत्या दहशतीचा थेट परिणाम मंचर नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारावर होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. रात्री दहापर्यंत प्रचार करण्याची अधिकृत वेळ असली तरी प्रत्यक्षात थंडी,अंधार लवकर पडत असल्याने उमेदवार आणि कार्यकर्ते स्वतःची सुरक्षित बाळगताना दिसत आहे. निवडणुकीचा प्रचार रात्री उशिरापर्यंत चालत असतो. घराघर भेटी, कोपरा सभा, जनसंपर्क मोहीम या बहुतांश क्रिया संध्याकाळीनंतर अधिक जोमात होतात. पण सध्या शहराच्या प्रवेशद्वारांपासून ते उपनगरी वस्त्यांपर्यंत बिबट्याचे हालचाली वाढल्याने उमेदवार आणि त्यांच्या टीमला अंधारात रस्त्यांवर फिरणे धोकादायक वाटू लागले आहे. काही ठिकाणी संध्याकाळी आठनंतर रस्त्यांवर वर्दळ नगण्य होत असून कार्यकर्त्यांचा प्रचाराचाही उत्साह त्यामुळे कमी जाणवत आहे.गावातील मुळेवाडी रोड, जुना चांडोली रस्ता,एस कॉर्नर, डोबीमळा, सुलतानपूर रोड चिंचोटी तसेच अवसरी कॉलेज रस्ता जंगलपट्टीलगतच्या वस्त्यांमध्ये रात्री प्रचाराला जाण्यास कार्यकर्ते कचरू लागले आहेत. अनेक उमेदवारांनी आपल्या प्रचार वेळेत बदल करून सकाळ,दुपार आणि संध्याकाळी ८ वाजण्याच्या अगोदरच गाठीभेटींवर भर द्यायला सुरुवात केली आहे. मतदानापर्यंत भीतीचे सावट एकूणच, बिबट्याच्या सततच्या वावरामुळे मंचरमध्ये निवडणुकीचा प्रचार पारंपरिक गजबजणारा न होता संथ आणि सावधपणे चालू आहे. मतदानापर्यंत ही भीती कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि वनविभागाकडून अधिक दक्षतेची मागणी नागरिकांकडून होत आहे.