प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीची निवडणूक मंगळवार, दि.२ रोजी होत असून मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना शहरातील हॉटेलांमध्ये उमेदवारांच्या जेवणावळींना मोठी उठाव मिळत आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार समर्थकांना खुश करण्यासाठी दररोज व्हेज-नॉनव्हेज जेवणाचे आयोजन करत असून अनेक ठिकाणी सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांची गर्दी उसळत आहे. शहरातील प्रमुख हॉटेल, ढाबे व फुड पॉइंट पूर्ण क्षमतेने भरले असून जागा मिळणे कठीण झाले आहे. काही उमेदवारांच्या तळावर तर दिवसाला अनेक फेऱ्यांनी जेवणावळी घेतल्या जात असल्याची चर्चा आहे. वाढती मागणी लक्षात घेत हॉटेल चालकांनी स्वयंपाकी, वेटर्स आणि किचन स्टाफ वाढवला असून मालकांना अतिरिक्त खरेदी, गॅस व इंधन पुरवठा यांची धांदल उडाली आहे. निवडणूक प्रचाराचा जोर वाढत असताना या जेवणावळींमुळे खाद्यव्यवसायाला अनपेक्षित उठाव मिळाल्याचे चित्र दिसत आहे. शहरात “हॉटेल फुल”च्या पाट्या सर्वत्र झळकत असून तीन दिवस प्रचार शिगेला पोहोचताच ही धावपळ आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “निवडणुकीमुळे एवढी वर्दळ याआधी कधी पाहिली नाही.सकाळपासून रात्रीपर्यंत ऑर्डरी चालू आहेत. उमेदवारांच्या जेवणावळींमुळे हॉटेल फुल झाले आहे. स्टाफ वाढवूनही ताण कमी होत नाही.” -अजय काटे,हॉटेल आस्वाद, मंचर.