प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेल्या अपक्ष उमेदवार प्राची थोरात यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर आणि मिळालेले चिन्ह रिक्षा घरोघरी पोहचवण्यासाठी भर दिला जात आहे. प्राची थोरात यांचे सासरे ज्येष्ठ नेते संजय थोरात यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर मी नक्कीच निवडून येईल.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मंचर येथे देवानंद देठे,फकीरा देठे, निलेश देठे,विनोद भालेराव,विनय भालेराव इत्यादींनी नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेल्या अपक्ष उमेदवार प्राची थोरात यांचे स्वागत केले. यावेळी संविधान दिनाची शपथ घेण्यात आली. मंचर नगरपंचायत नगराध्यक्ष पद ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याने संजय थोरात यांनी त्यांच्या स्नूषा प्राची थोरात यांना नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरवले आहे. प्राची थोरात उच्चशिक्षित, सुसंस्कृत व्यक्तिमत्व असून त्या आकाश डेअरी उद्योग अतिशय योग्यरीत्या सांभाळतात. राजकारणाची आवड असलेल्या प्राची थोरात अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार करत असताना त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संजय थोरात यांनी केलेली विविध विकास कामे व सामाजिक कामाचा त्यांना लाभ होताना दिसत आहे. संजय थोरात गेली १० वर्ष समाजकार्यात कार्यरत असून पक्षाच्या माध्यमातून विविध कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. अनेकदा स्वखर्चाने गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवले आहेत.एक कॉल प्रॉब्लेम सॉल तसेच अनेक वर्षापासून सुरू असलेल्या जनता दरबारामुळे हजारो नागरिकांची कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी आपण शंभर टक्के निवडून येऊ असा विश्वास प्राची थोरात यांनी वर्तवला आहे.