प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायत निवडणुकीत विविध पक्षांनी केलेल्या तिकीट वाटपावरून मोठी नाराजी उफाळून आली आहे. दीर्घकाळ पक्षावर निष्ठा ठेवणारे, प्रामाणिकपणे काम करणारे अनेक कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार यांना बाजूला सारून काही पक्षांमधून नुकतेच आयात झालेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप सर्वसामान्य कार्यकत्यांकडून मतदारांकडून ला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी वेळ, श्रम आणि आर्थिक योगदान देणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांची नावेदेखील चर्चेत येऊ न देणे, तर अचानक दाखल झालेल्या बाहेरगावच्या किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तींना थेट तिकीट देणे, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. काही उमेदवार पैसेवाले असल्याने अथवा तिकीट वाटप करणाऱ्या वरिष्ठ नेत्यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना उमेदवारी दिल्याचा आरोपही मतदारांमधून व्यक्त होत आहे. अनेक प्रामाणिक इच्छुक उमेदवारांना ‘कात्रजचा घाट’ दाखवून त्यांची उमेदवारी कापण्यात आली.मेहनत, जनसंपर्क आणि निष्ठा असूनही उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक कार्यकर्ते निराश झाले आहेत.“निष्ठावंतांची चेष्टा आणि गद्दारांची वाहवा” अशी वेळ आल्याची टीका मतदारांकडून होत आहे. या तिकीट वाटपामुळे अनेक वॉर्डांमध्ये बंडखोरीची शक्यता वाढली असून काही ठिकाणी तर बंडखोर उमेदवारांनी स्वतंत्र उमेदवारी कायम ठेवली आहे.त्यामुळे निवडणुकीतील स्पर्धा अधिक रंगतदार तर झालीच आहे, पण पक्षांतर्गत नाराजीमुळे आगामी निकालांवर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.