प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर शहरात नगरपंचायत निवडणुकीची धग दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत गतिमान पद्धतीने सुरू आहे. उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्ग अवलंबताना दिसत आहेत. मतदारांना पैसे देताना मत आमच्या उमेदवाराला मिळाले पाहिजे. यासाठी पैशांचा महापूर, भंडारा उचलणे, देवाच्या नावाने शपथा घेणे अशा पद्धतींनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. काही भागांत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून तळी भंडार करून मतदारांकडून मतदानाचे साकडे घातले जात असल्याचीही माहिती समोर येत आहे. देवदर्शन, प्रसाद, भंडारा यांच्याद्वारे मतदारांचे मन वळवण्याची स्पर्धा वाढत असून मतदान वळवण्यासाठी धार्मिक भावनांचा वापर केल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. शहरातील विविध प्रभागांमध्ये रात्री उशिरापर्यंत बैठकांचे सत्र, गुप्त दौरे आणि आर्थिक आमिष देण्याचे प्रकार सुरू असल्याने प्रामाणिकपणे निवडणूक लढवणार्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. वाढत चाललेली पैशांची देवाणघेवाण आणि भंडार्यांच्या माध्यमातून मत मागण्याची पद्धत पाहता आगामी निवडणुकीत मतदारांच्या स्वतंत्र निर्णयक्षमतेवर मोठा परिणाम होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.