प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 2) मतदान होणार असून प्रशासनातर्फे सर्व तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक प्रतिनिधींना यंत्रांचे वाटप आज (सोमवारी) दुपारी क्रीडा संकुल येथे करण्यात आले.नगरपंचायतीतील एकूण सोळा प्रभागांसाठी तसेच नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत आहे. मतदारांची सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडावे. यासाठी निवडणूक प्रतिनिधींना मतदान यंत्रांचे (ईव्हीएम) वाटप करण्यात आले. प्रत्येक प्रतिनिधीला त्यांच्या मतदार केंद्रानुसार यंत्रे, आवश्यक साहित्य, कायमस्वरूपी मतदान नोंदवही आणि सुरक्षा सील देण्यात आली. यंत्रे व्यवस्थित काम करत आहेत की नाही, याची प्राथमिक तपासणीही त्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. मतदान प्रक्रियेची सविस्तर माहिती तसेच कोणती काळजी घ्यावी. याबाबत मार्गदर्शक सूचना निवडणूक अधिकारी अंजली कुलकर्णी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी गोविंद जाधव यांच्या कडून देण्यात आल्या. मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पडताळणी, यंत्र हाताळणी, मतदान गोपनीयता आणि दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सुलभता याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या. निवडणुकीदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून सुरक्षेचे काटेकोर नियोजन करण्यात आले असून पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. मंगळवार दि. 2 रोजी होणार्या या निवडणुकीत मतदारांचा सहभाग अधिकाधिक वाढावा, यासाठी प्रशासनाने आवाहन केले आहे.