प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायत निवडणुकीत माघारीच्या प्रक्रियेला वेग आला असून दोन दिवसांत एकाच उमेदवाराने माघार घेतली आहे. प्रभाग क्र. १५ मधील अपक्ष उमेदवार रूपाली इंद्रजीत दैने यांनी आज माघार घेतली. शुक्रवार दि.२१ रोजी माघारीचा शेवटचा दिवस असल्याने अनेक जणांच्या भूमिकेकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.नगराध्यक्षपदासाठी एकूण सहा उमेदवारी अर्ज वैध ठरले असून त्यात दोन महत्त्वाच्या अपक्ष उमेदवारांकडे सर्वांचे लक्ष आहे. शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष जागृती महाजन यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर निर्णय प्रक्रियेत स्वतःला सहभागी न केल्याचा आरोप त्यांनी पक्षावर केला असून अद्याप कोणत्याही नेत्याने आपल्याशी संपर्क साधलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाजन या निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.दरम्यान, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात यांची स्नूषा प्राची थोरात ह्याही अपक्ष म्हणून नगराध्यक्ष पदाच्या मैदानात आहेत. त्यांनी भाजपाच्या वतीने अर्ज भरला होता, मात्र, एबी फॉर्म न मिळाल्याने तो अर्ज बाद झाला.वरिष्ठांनी चर्चा केली असली तरी पक्षाने संधी न दिल्याने अपक्ष म्हणूनच नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याचे संजय थोरात यांनी सांगितले. मंचर नगरपंचायतच्या १७ प्रभागांसाठी तब्बल ८३ उमेदवार रिंगणात आहेत. अनेक पक्षांतील इच्छुकांना अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले असून विशेषतः राष्ट्रवादीतील इच्छुकांचे प्रमाण अधिक आहे. अपक्षांची मनधरणी सुरू अपक्ष उमेदवारांची मनधरणी दिवसभर सुरू असून काहींना स्वीकृत सदस्यत्वाची हमी देण्यात आल्याचे समजते.शुक्रवारी माघारीचा दिवस असल्याने अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार यांनी आघाडीबाबतचा निर्णय अद्याप झालेला नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाबरोबर चर्चा सुरू असून काँग्रेससोबत जागावाटपावर अंतिम निर्णय शुक्रवारी अपेक्षित असल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले यांनी दिली.