प्रभात वृत्तसेवा मंचर – अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मंचर येथील आरटीआय कार्यकत्याविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिढीत मुलीने मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवार दि.२ रोजी पिढीत अल्पवयीन मुलगी व तिचा मित्र मोटरसायकलने ओझर येथून सासवडकडे जात असताना मंचर येथे एका हॉटेलजवळ आले असता त्याचे मोटरसायकलचे पेट्रोल संपले. त्यावेळी अल्पवयीन मुलीचा मित्र पेट्रोल आणण्यासाठी गेला होता. संबंधित मुलगी एका हॉटेलमध्ये जेवण करण्यास थांबली होती. त्यावेळी त्या ठिकाणी श्याम थोरात यांनी मुलीला तुला पेट्रोल पंपाजवळ सोडतो, असे सांगून तीला चारचाकी गाडीत बसवून तिला कळंब (ता.आंबेगाव) येथील एका हॉटेलजवळ आणले. त्या ठिकाणी गाडी थांबवून गाडीचा दरवाजा लॉक करून त्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शाम शांताराम थोरात यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाम थोरात हा आरटीआय कार्यकर्ता असून त्याने यापूर्वीही अनेकांना त्रास दिल्याच्या तक्रारी मंचर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. थोरात याने अजूनही कुणाला त्रास दिला असल्यास त्यांनी मंचर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी केले आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करत आहे.