Sandeep Dhaliwal : भारतीय वंशाच्या शीख पोलिसाच्या मारेकऱ्याला अखेर फाशीची शिक्षा; हत्येचे प्रकरण…

ह्युस्टन – भारतीय वंशाचे पोलीस अधिकारी संदीप धालिवाल (Sandeep Dhaliwal) यांच्या हत्येप्रकरणी टेक्सास प्रांतातील न्यायालयाने एका व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. (Murderer of Indian-American Sikh police officer sentenced to death) 2019 मध्ये ट्रॅफिक स्टॉपजवळ ही हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा निकाल सुनावताना ज्युरींनी कोणतीही दयामाया न दाखवता दोषी रॉबर्ट सोलिस याला फाशीची शिक्षा सुनावली. बुधवारी या प्रकरणाची शिक्षा सुनावली गेली.
संदीप धालिवाल (Sandeep Dhaliwal) हे हॅरीज कौंटीच्या शेरीफ कार्यालयामध्ये 10 वर्षांपासून पोलीस सेवेत होते. त्यांच्या हत्येप्रकरणी हॅरीज कौंटीच्या ज्युरींनी सोलिस याला दोषी ठरवले होते. धालिवाल यांच्या हत्येचे प्रकरण देशभर गाजले होते. शीख असल्यामुळे त्यांना पोलीस दलात सेवेत असतानाही दाढी वाढवण्याची आणि पगडी परिधान करण्याची विशेष परवानगी देण्यात आली होती. दाढी आणि पगडी ठेवणारे अमेरिकेच्या पोलिस दलातील ते पहिले अधिकारी होते.
दिनांक 27 सप्टेंबर 2019 रोजी ह्युस्टन शहराच्या वायव्येला रात्रीच्यावेळी गस्तीच्यावेळी झालेल्या चकमकीदरम्यान झालेल्या गोळीबारात धारिवाल यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. धारिवाल यांनी सोलिस याची कार थांबवून चौकशी केली होती. त्यानंतर ते पुन्हा आपल्या वाहनाच्या दिशेने जात असताना सोलिस याने धालिवाल यांच्यावर पाठीमागून एकापाठोपाठ एक अनेक गोळ्या झाडल्या होत्या. त्याने अगदी जवळून आणि निर्दयपणे धालिवाल यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या, असे शारीफ यांनी म्हटले होते.
या प्रकरणाचा तपास करताना 65 साक्षीदार तपासले गेले होते. त्यांनी सोलिस याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत माहिती दिली होती. धालिवाल यांनी थांबवले असता, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती वाटल्यामुळे सोलिस याने मुद्दाम गोळीबार करून धालिवाल यांची हत्या केल्याचे सरकारी पक्षाने सिद्ध केले.





