Koregaon Bhima : दोन वर्षांपासून गुंगारा देणारा जेरबंद
Koregaon Bhima : वरिष्ठांच्या सूचनेनुसार शिक्रापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. त्याच्या संभाव्य वास्तव्याच्या ठिकाणी तसेच ये-जा करण्याच्या मार्गांवर पाळत ठेवण्यात आली.

कोरेगाव भीमा : खुनाचा प्रयत्न, अपहरण, जबरी चोरी आदी गंभीर गुन्ह्यांसह विविध पोलीस ठाण्यांत नऊ गुन्हे दाखल असलेला तसेच दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड (वय २३, रा.भोसे, काळूस रोड, ता. खेड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिक्रापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने खेड तालुक्यातील वाकी येथे सापळा रचून ही कारवाई केली. शिक्रापूर पोलीस ठाण्यात (दि.२४) जून २०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून राठोड पोलिसांना सतत चकवा देत होता. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी तो वारंवार राहण्याची ठिकाणे बदलत असल्याने त्याचा ठावठिकाणा मिळत नव्हता.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार शिक्रापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. त्याच्या संभाव्य वास्तव्याच्या ठिकाणी तसेच ये-जा करण्याच्या मार्गांवर पाळत ठेवण्यात आली. अखेर वाकी येथे तो येणार असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक यादव यांच्या सूचनेवरून पोलिसांनी सापळा रचला. पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, हवालदार शिवाजी चितारे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश भंडारे यांनी त्याला ताब्यात घेतले.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ.शुभम कुमार, शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वात ही कारवाई केली. पथकात पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जिनेश कोळी, हवालदार अमोल दांडगे, शिवाजी चितारे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश भंडारे, राम जाधव, नारायण वाळके, मच्छिंद निचीत, विकास बांगर, भारत भोसले यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलीस कॉन्स्टेबल विकास बांगर करीत आहेत.
नऊ गुन्ह्यातील सराईत
कसून चौकशी केल्यानंतर संबंधित गुन्ह्यात त्याला अटक केली. अटकेतील राठोड याच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात चार, दहीवडी, चाकण, शिक्रापूर आणि सासवड पोलीस ठाण्यांत प्रत्येकी एक असे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये घरफोडी, चोरी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे.





