केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला, धक्काबुक्की करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

बेगुसराय (बिहार) : केंद्रीय मंत्री आणि बिहारमधील बेगुसरायचे खासदार गिरिराज सिंह यांच्यावर एका तरुणाने हल्ला केला. बेगुसरायमधील बलिया येथील जनता दरबारातून गिरिराज सिंह बाहेर येत असताना हा हल्ला झाला. तरूणाने केंद्रीय मंत्र्याला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला लगेच पकडले. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये धक्काबुक्की होत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर पोलिस संरक्षण वाढवून केंद्रीय मंत्र्यांना नेण्यात आले.
गिरीराज यांनी विरोधकांवर साधला निशाणा –
केंद्रीय मंत्री सुखरूप असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. स्वत:वर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ही दुःखद घटना आहे. आरोपीचा चेहरा पाहिल्यानंतर तेजस्वी आणि अखिलेश त्याच्या समर्थनार्थ उतरण्याची शक्यता आहे. सध्या पोलीस आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी करत आहेत.
आरोपीची ओळख पटली –
मिळालेल्या माहितीनुसार, गिरीराज सिंह बलिया भागातील लोकांच्या समस्या ऐकत होते. तेवढ्यात पांढरी टोपी घातलेला एक तरुण तिथे आला आणि त्याने काही अपशब्द उच्चारले. भाजप कार्यकर्त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने केंद्रीय मंत्र्याच्या दिशेने धाव घेतली आणि गिरीराज सिंह यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ त्याला पकडले. मोहम्मद सैफी असे या तरुणाचे नाव असून तो एका पक्षाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी नगरसेवक असल्याचेही बोलले जात आहे. मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.





