ममता बॅनर्जीला दणका

3 आमदारांसह 60 नगरसेवकांचा भाजप पक्षात प्रवेश

नवी दिल्ली- पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना हादरा बसला असून पक्षाच्या 60 नगरसेवकांनी आणि दोन आमदारांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला आहे. याशिवाय डाव्या पक्षांमधील एका आमदारानेही भाजपात प्रवेश केला.

पश्‍चिम बंगालमधील 18 जागांवर विजय मिळवल्यानंतर भाजपने आता स्थानिक राजकारणावर लक्ष केंद्रीत केले आहे. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे दोन आमदार आणि 60 नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत या आमदार आणि नगरसेवकांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. 2017 मध्ये टीएमसीतून भाजपात सहभागी झालेले मुकुल रॉय यांचा मुलगा आमदार शुभ्रांशू रॉयसह तीन आमदारांनी भाजपात प्रवेश केला. यामध्ये एका सीपीएमच्या आमदाराचाही समावेश आहे. बीजपूरचे आमदार शुभ्रांशू रॉय, आमदार तुषार कांती भट्टाचार्य आणि सीपीएम आमदार देवेंद्र रॉय यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.

प. बंगालमधील काचरापारा महापालिकेचे 17 नगरसेवक भाजपात सहभागी झाले. यामध्ये महापौर आणि उपमहापौराचाही समावेश आहे. एकूण 26 सदस्य असलेल्या या महापालिकेतील 17 सदस्य भाजपात आल्याने इथे भाजपची सत्ता आली आहे. याशिवाय आणखी दोन महापालिकांवरही भाजपने वर्चस्व मिळवले आहे. तीन महापालिकांमधील 60 नगरसेवक भाजपात सहभागी झाले आहेत.

लोकसभा निवडणूक सात टप्प्यांमध्ये पार पडली. त्याच पद्धतीने आता पश्‍चिम बंगालमधील विरोधी पक्षांमधील नेतेही सात टप्प्यांमध्ये भाजपात दाखल होतील. यातील पहिला टप्पा आज पार पडला, असा दावा विजयवर्गीय यांनी केला.
भाजपाला राज्यात जो मोठा लाभ झाला आहे त्यात डाव्यांच्या मतांचा वाटा भाजपाकडे आलेला दिसत आहे. डाव्यांना 2014 मध्ये 39 टक्के मते होती. त्यांना यावेळी सुरुवातीला 7 टक्के मिळालेली दिसत होती. आता तृणमूल कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांमधील आमदार भाजपात जात असल्याने पश्‍चिम बंगालमध्ये आगामी काळात तृणमूल विरुद्ध भाजपा हा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तृणमूल कॉंग्रेसचे 30 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)