Mamata Banerjee – पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती ब्रिटिशांनी १९०५ मध्ये केलेल्या बंगालच्या फाळणीची आठवण करून देणारी असल्याचा आरोप करत भाजपने शनिवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तीव्र टीका केली. एसआयआर थांबवण्यासाठी आणि बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांचे संरक्षण करण्यासाठी राज्यात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताला एकसंध ठेवण्यासाठी आपल्याला एकजूट राहावे लागेल. एक आहोत तर सुरक्षित आहेत. यावेळी बोलताना पात्रा यांनी दावा केला की, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस सरकार बंगालला भारतापासून वेगळे करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मुर्शिदाबादमध्ये सुरू असलेला हिंसाचार, राष्ट्रीय महामार्ग १२ रोखणे, रेल्वे सेवा ठप्प करणे आणि गाड्या जाळण्याच्या घटना गंभीर आहेत. निवडणूक अधिकारी सुरक्षित नसून, टीएमसी कार्यकर्त्यांच्या दबावामुळे प्रशासनावर मोठा ताण असल्याचा आरोपही संबीत पात्रांनी केला. सीमेवरील ७२ संवेदनशील ठिकाणी कुंपण घालण्यासाठी राज्य सरकार जमीन देत नसल्यामुळे अवैध घुसखोरी वाढत असल्याचा दावा पात्रा यांनी केला. यामुळे मुर्शिदाबाद, उत्तर दिनाजपूरसारख्या जिल्ह्यांतील लोकसंख्येची रचना बदलत असल्याचे त्यांनी सांगितले. बंगालमधील लोकसंख्येत झालेली वाढ ही नैसर्गिक नसून बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांमुळे झालेली कृत्रिम वाढ असल्याचा आरोप करत, पात्रा यांनी बंगालच्या जनतेला या घडामोडींविरोधात जागृत होऊन एकत्र येण्याचे आवाहन केले.