पोटनिवडणूक : भवानीपूरमधील 57 टक्के मतदार ठरवणार ममतांचे भवितव्य

कोलकता – पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी 57 टक्के मतदान झाले. मतदानाचा हक्क बजावलेले ते मतदार राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भवितव्य ठरवणार आहेत.
भवानीपूर, जंगीपूर आणि समशेरगंज या बंगालमधील विधानसभेच्या तीन जागांसाठी गुरूवारी मतदान झाले. त्याची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केली. त्यानुसार, जंगीपूरमध्ये 77 टक्क्यांहून अधिक, तर समशेरगंजमध्ये सुमारे 80 टक्के मतदानाची नोंद झाली. तेथील निकाल 3 ऑक्टोबरला जाहीर होतील.
ममता रिंगणात असल्याने भवानीपूरमधील निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी ममतांना पोटनिवडणुकीत विजय मिळवणे गरजेचे आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारून तृणमूल कॉंग्रेसने सलग तिसऱ्यांदा बंगालची सत्ता मिळवली. मात्र, त्या निवडणुकीत ममतांना नंदीग्राम मतदारसंघात पराभूत व्हावे लागले. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी त्यांना आमदार बनणे अनिवार्य आहे. ती संधी त्यांना पोटनिवडणुकीने मिळवून दिली आहे. त्यामुळे भवानीपूरमधील निकाल उत्सुकतेचा विषय बनला आहे.



