कोलकता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीसाठी एकला चलो रे चा नारा दिला. कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्याची शक्यता त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली.
ममतांनी सोमवारी तृणमूलच्या आमदारांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा इरादा जाहीर केल्याची माहिती पक्षाच्या सुत्रांनी दिली.
कॉंग्रेसने दिल्लीत आपला मदत केली नाही. आपने हरियाणात कॉंग्रेसला सहकार्य केले नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी भाजपचा विजय झाला. भाजपविरोधात एकत्र यायला हवे. मात्र, बंगालमध्ये कॉंग्रेसची ताकद नगण्य आहे. त्यामुळे तृणमूल स्वबळावर लढेल. आपण एकटे पुरेसे आहोत. आगामी निवडणुकीत दोन-तृतीयांश बहुमत मिळवून तृणमूल सलग चौथ्यांदा सरकार स्थापन करेल, असा विश्वास ममतांनी व्यक्त केला.
भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी समझोता करायला हवा. अन्यथा, राष्ट्रीय स्तरावर भाजपला रोखणे इंडिया आघाडीच्या दृष्टीने अवघड बनेल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. बंगालमध्ये पुढील वर्षीच्या मार्च-एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्यासाठी आता वर्षभराचाच कालावधी शिल्लक आहे.