कोरोनाला रोखण्यासाठी ममतांकडून पोलिसांवर मोठी जबाबदारी

कोलकाता – देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत असून कोरोनाला रोखण्यासाठी आता केंद्र व राज्य सरकारतर्फे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.
ममता यांच्या निर्णयानुसार आता राज्यातील जनतेला अन्नधान्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, “राज्य सरकारतर्फे नागरिकांना अन्नधान्याची कमतरता भासणार नाही याबाबतची खबरदारी घेण्यात आली असून पश्चिम बंगाल पोलीस नागरिकांना अन्नधान्याचा घरपोच पुरवठा करतील. पोलिसांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी जिल्हा दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक बजावतील.” अशी माहिती दिली.
आज मध्यरात्री १२ वाजल्यापासून देश लॉक डाऊन करण्यात आला असून यामुळं नागरिक अन्नधान्याची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसत आहेत. ही गर्दी टाळण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.





